माणसाला विषयाची खोली असली की त्याच्याकडे त्याचे स्वतंत्र मत, स्वतंत्र दृष्टी आपणहून निर्माण होते. त्यातच तो माणूस राजकारणात राहून समाजकारण करण्यात गुंग असला की त्याला जनमताकडून विशेष उपाधी प्रदान केली जाते. ‘बापमाणूस’ त्यातलीच एक प्रिय उपाधी आहे. मात्र आपल्या रोखठोक व्यक्तिमत्वामुळे, विलक्षण कार्यकतृत्वामुळे आणि सामान्यपेक्षा अधिक प्रशासकीय ज्ञानामुळे अनोखी ‘दादा’माणूस ही उपाधी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका कार्यसम्राटाला दिली गेली आहे ते म्हणजे या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. लोकशाहीतून आपसूक निर्माण झालेली ओळख कधीच पुसली जात नाही. अशी ही ओळख लोकांनी अजितदादांना दिली आहे. जनांचा कैवारी, जनांचा पाठीराखा अशी त्यांची ओळख तीन दशकांपासून असून मोठ्या मनाचे दादा असेही उद्गार जनतेच्या मुखातून बाहेर पडतात. कुणी मदत मागितली आणि दादांनी त्यास मदत केली नाही असं म्हटल्यास ती व्यक्ती अपवाद म्हणता येईल. कारण काम एक टक्का जरी होणं शक्य असेल तर कुणीही दादांच्या दरवाजातून रिकाम्या हाताने मागे फिरत नाही, अशी त्यांची ख्याती आहे.
अजितदादांनी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण आणि क्रीडा संस्था, जिल्हा बँक, राज्य बँक व त्यानंतर खासदारकी, आमदारकी, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच मग उपमुख्यमंत्री अशा विविध मुख्य भूमिका आणि जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. ‘बाप’माणूस म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा घडले. अजितदादांना माणसांची चांगली पारख आहे. विकास विशेषतः सुव्यवस्थित नियोजनबद्ध विकास हा तर दादांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता आहे ते सर्व गुण अजितदादांमध्ये आहेत. त्यामुळेच अजितदादांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्यास दिली तर विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचा चेहरा सरसकट बदलेल यात शंका नाही. राज्याला गतिमान करण्याची धमक अजितदादांमध्ये आहे. राजकारणात सामाजिक भान ठेऊन सदैव समाजकारण करणारे ‘दादा’माणूस अजित पवार हे राजकीय वर्तुळातील अजब रसायन आहे हे तमाम महाराष्ट्राला अवगत झालेलं आहे.
जो जनतेत अधिक लोकप्रिय असतो, ज्याची योग्यता अधिक त्याला विरोधी पक्षात शत्रू अधिक हे समीकरण ठरलेले आहे. जो मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार आहे, त्याला जास्तीतजास्त बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असतो. अशावेळी माध्यमांचे लक्ष देखील वेधले जाते. अजितदादा हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत हे अक्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यांच्या हातात मुख्यमंत्री पदाची सूत्रे दिली गेली तर, महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरू शकतो असा ठाम विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे.
‘दादा’माणूस अजित पवार यांच्या बुद्धिमत्तेचे, धाडसीपणाचे, प्रशासनाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करतो. विकासाची व्यापक दृष्टी, तत्परता, वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, पुरोगामीत्व, कार्यशीलता ही दादांची वैशिष्ट्ये आहेत. दादांची प्रशासनावर मजबूत पक्कड आहे. गोरगरिबांबद्दल ममत्व, तमाम कला व कलाकारांबद्दल आदर दादांना आहे. महाराष्ट्राला जलद मार्गाने प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारे असे नेतृत्व सापडणे अवघडच!
अजितदादांची राजकीय आणि प्रशासकीय कामाची पद्धत धडाकेबाज असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा एक वेगळा दरारा आहे. राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींसह ते समोरील पक्षातील लोकप्रतिनिधींनाही खडे बोल सुनावतात. कार्यकर्तृत्व, बुद्धिचातुर्य आणि बेरजेच्या राजकारणाने अजितदादांनी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा ह्या ‘दादा’माणूस व्यक्तिमत्त्वाकडून महाराष्ट्राच्या जनतेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत.