वडिलकीच्या नात्याने अजित दादा

तारीख मे २०२३. महाराष्ट्राच्या काळजाचे ठोके चुकवणारा दिवस. यादिवशी शरद पवार साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच काय तर संपूर्ण देशाला आश्चर्याचा जबर धक्का दिला. यावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यासारख्या आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या या निर्णयाला विरोध केला. साहेबांनी अश्या प्रकारे आम्हाला सोडू नये अशी भावनिक साद सर्वांनी घातली. पण या सर्व गदारोळात सर्वात वेगळी भूमिका मांडली ती फक्त अजित दादांनी 

सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया दादांनी ऐकून घेतल्या, आणि माईक त्यांच्याजवळ आला. अजित दादाही साहेबांच्या या निर्णयाला विरोध करतील असे वाटत असतानाच दादांनी साहेबांच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि उपस्थित सर्वांच्या कपाळावर आट्या आल्या. पण खरे पाहता दादांनी घेतलेली भूमिका ही समर्पक होती 

प्रॅक्टिकली विचार करता साहेबांनी घेतलेला निर्णय त्यांचे वय पाहता योग्य आहे त्याला आपण पाठींबा द्यायला हवा असे अजित दादांचे म्हणणे होते. साहेब अध्यक्ष पदावरून पायउतार होत आहेत यावरून ते राजकारण आणि समाजकारण सोडत आहे असा याचा अर्थ होत नाही. साहेब कायम आपल्याला मार्गदर्शन करायला हजर असतील असे दादांनी सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा सर्व सभागृह भावनिक झालेला असताना अजित दादा मात्र वडीलकीच्या नात्याने खंबीर भूमिका घेऊन परिस्थिती सांभाळली.    

कोणत्याही आनंदाच्या असो किंवा दुःखाच्या प्रसंगात भावनांचा प्रचंड उद्रेक झालेला असतो अशावेळी कोणीतरी वडीलकीच्या नात्याने किंवा एकदम हक्काने खंबीर भूमिका घेऊन परिस्थिती शांत करायची असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा सोडता कार्यकर्त्यांना शांत करू शकतील, दम देऊ शकतील असा दुसरा कोणताही नेता नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही नेत्याला कार्यकर्ते जुमानतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे दादांना ती भूमिका घ्यावी लागली. यावेळेस पवार साहेबांनी किंवा प्रतिभाकाकींनी सुद्धा त्यांना टोकले नाही हे कोणाच्या लक्षात आले नाही 

घरातील खमका पुरुष हा कधीच डगमगत नाही. कितीही मोठं संकट आलं तरी कुटुंब प्रमुख हा शांत आणि संयमी राहून घरातील इतर सदस्यांना आधार देत असतो. वेळप्रसंगी कठोर शब्दात परिस्थिती सांभाळत असतो. पण दादांच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांना व्हिलन केले जात आहे हे अत्यंत बाळबोध आहे.   

राजकारणात अचानक काहीच होत नाही. दादांना आणि सुप्रिया ताईंना साहेबांचा हा निर्णय आधीपासूनच माहित होता हे दादांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. पवार साहेबांसारखा राजकारणी कोणताच निर्णय उथळपणे घेणार नाही हे अजित दादा आणि सुप्रिया ताईंना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी साहेबांना विरोध केला नाही. उलट त्यांच्या उतरत्या वयात जर भावी अध्यक्षाला घडवता आले तर ते पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी हिताचे आहे अशी दादांनी भूमिका घेतली. आणि यात चुकीचे काहीच नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या हिताचा विषय येतो तेव्हा दादांसारखा खंबीर माणूसच धावून येतो परिस्थिती हाताळायला. दादा म्हणूनच दादा आहे