अजित दादा लवकरच मुख्यमंत्री होतील..!

महाराष्ट्रात असे असंख्य कार्यकर्ते आणि दादा समर्थक आहे ज्यांना अजित दादा पवार यांना एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान पाहायचे आहे. आजवर दादांनी ४ वेळा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. पण त्यांचे काम मुख्यमंत्री पदापुढे झाकोळून गेले नाही. ते कायम दखलपात्र राहिले. त्यांनी दिलेला शब्द ते कधीही विसरले नाहीत. ज्या धडाडीने त्यांनी काम केले तो वेग विलक्षण होता. यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात दादांविषयी आशा पल्लवित झाल्या, कि हा जो व्यक्ती आहे तो काहीतरी करू शकतो, तोच बदल घडवू शकतो. दादा मुद्द्यावर बोलतात, वायफळ बडबल करत नाही. जनतेचे मुख्य प्रश्न हाताळतात. जोवर त्यांना कुणी वैयक्तिक पातळीवर डिवचत नाही तोवर तेही कुणाला काही बोलत नाही. सोमवार ते शुक्रवार विधिमंडळ तसेच महाराष्ट्रभर दौरे आणि शनिवार व रविवार आपल्या लाडक्या बारामतीची कामे. दादांचा दिनक्रम ठरलेला असतो. तो कधीच चुकत नाही.

जनतेसाठी अविश्रांत काम करणारे दादाच जनतेला आवडतात. आजवर दादांनी कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास अश्या अनेक विभागांची कामगिरी लीलया पार पाडून आपला ठसा उमटवला आहे. आमदार, खासदार, मंत्री अश्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना शासकीय अधिकारी, सहकारी, गांवकरी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना आपल्या यशाचे श्रेय कायम दादा देत असतात.

उपमुख्यमंत्री पदावर असताना दादांनी महाराष्ट्राच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांनी महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० % जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, युवापिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी केली, शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला, मागासवर्गिय आणि अल्पसंख्यांक महामंडळांच्या निधीत भरघोस वाढ केली, शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषिपंप सवलतीच्या पदरात उपलब्ध करून दिले, जेजुरी, रत्नागिरी, कौडिण्यपूर, आदी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे शेकडो निर्णय दादांनी घेऊन महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.

आता फक्त मुख्यमंत्री पदावर दादा बसलेले पाहायचे आहे. कारण त्यांच्या काम करण्याची पद्धत आणि जनतेविषयी असलेली कणव या सारासार न्याय ते नक्की देऊ शकतील. संबंध महाराष्ट्राला मा. श्री. मुख्यमंत्री अजित अनंत पवार हे ठळक अक्षरात पाहायला नक्की आवडेल.