दादांचे जलनियोजन…

औद्योगिकीकरणातूनच राज्याच्या विकासाचा राजमार्ग खुला होऊ शकतो. या परिस्थितीत बळीराजाच्या शेतीचे पाणी, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मुबलक पाणी तसेच औद्योगिकीकरणासाठी व वीज निर्मितीसाठी पाणी या साऱ्याचा विचार करता पुरेसे जलस्रोत आणि समान पाणी पुरवठा याबाबत अचूक नियोजन करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार. 

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व आत्ताचे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जलसंपदा विभागाचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला. आदरणीय शरद पवार साहेबांच्या धोरणांचा अवलंब करीत अजितदादांनी नेहमी शेतकरी हिताचाच विचार केला. अजितदादा जलसंपदा मंत्री बनले आणि जलसंपदा खात्याची जबाबदारी हाती घेताच सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. शेती, पाणी व औद्योगिक वापरासाठी अधिकाधिक सिंचन प्रकल्प राबवणे आवश्यक आहे हे दादांनी जाणले होते. जलसिंचन प्रकल्पांच्या तसेच सिमेंट काँक्रिट नाला बंधाऱ्यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. ठिबक सिंचन योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी-अर्जदारांना अनुदानाची रक्कम तातडीने वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अजितदादांनी आपल्या जलसंपदा मंत्री असतानाच्या कार्यकाळात घेतला. त्या दृष्टिकोनातून त्यावेळी अर्थसंकल्पात तशी तरतूदही केली.

अजितदादांनी जलसंपदा मंत्री या पदाची धुरा सांभाळताना, कार्यभार पाहताना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत बारकाईने व गांभीर्याने अभ्यास केला. यातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होणारी घट आणि त्यात पावसाची अनियमितता यांसारखे अनेक प्रश्न समोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर तोडगा म्हणून धरण बांधकामाची सुरुवात, केनॉल, कालवे इत्यादी कामे प्राधान्याने पूर्णत्वास नेली. याशिवाय पाणी साठवण योजना यासारख्या योजना राबवल्या. यामुळे पाण्याची अडचण दूर झाली.

मराठवाडा विदर्भासहित उर्वरित महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी अजितदादांनी उपलब्ध करून दिला. गोदावरी, मांजरा नदीवरील बॅरेजेस, लघु पाटबंधारे याबरोबरच अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. एवढेच नव्हे तर जलसंपदा प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधीचा बंदोबस्त त्यांनी केला. त्यामुळे रखडलेले वनजमीन, पुनर्वसन, भूसंपादनाचे प्रश्न तडीस लागले. 

जलसंपदा मंत्री या नात्याने अजितदादांनी लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचे काम केले. त्यांचे जलसंपदा विभागातील काम संस्मरणीय आहे. महाराष्ट्रातील सर्व पाटबंधारे योजनांना गती देताना ठिबक आणि अनेक नव्या तंत्रज्ञानाचे बीज प्रक्रियांचे निर्णय त्यांनी घेतले. खोरेनिहाय धरण, पाटबंधारे, पाणलोट यासंदर्भात सर्वांगीण विचार करताना दादांनी धडक कामे मार्गी लावली. परिणामी अजितदादांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राबवलेल्या योजनांमुळे २००७-०८ ते २०११-१२ या पाच वर्षांच्या कालावधीत राज्याच्या सिंचन क्षेत्रात ५.९२ म्हणजे जवळपास ६ लाख हेक्टरने वाढ झाली. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढवण्याचा कृतिशील ठोस प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे कृषी उत्पन्न वाढीला आणि कृषी प्रगतीला मोठी चालना मिळाली. अशा पद्धतीने अजितदादा पवार यांनी पाण्याची अडचण असणाऱ्या जागोजागी जलस्रोत निर्माण केले.