दादांच्या ‘त्या’ निर्णयाला 2 महिने पूर्ण

राजकारण म्हटलं कि आरोपांच्या फैऱ्या आल्याच. दादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन आता जवळपास २ महिने झाले. भाजपच्या दडपशाहीला घाबरून अजित आणि इतर मान्यवर मंडळी सत्तेत सामील झाली असा आरोप विरोधकांनी केला. पण यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहिले पाहिजे. पवार साहेब हे अजित दादांचे राजकारणातील गुरु आहेत हे दादांनी कित्येकदा जाहीर सभेत मान्य केलं आहे. पण व्यक्तिपरत्वे देखील काही मतभेद असू शकतात. त्याचबरोबर पवार साहेबांचे काही निर्णय कसे पक्षाला अडचणीत आणतात आणि नेत्यांना बुचकळ्यात पाडतात हे दादांनी एका जाहीर सभेत कथन देखील केले. २०१४ ला पवार साहेबांनी भाजपला न मागता दिलेला पाठिंबा असो वा २०१७ मध्ये सत्तेत जाण्याच्या हालचाली असो, पवार साहेब स्वतःहून सत्तेत सामील होण्याच्या हालचाल भूतकाळात करीत होते.

अजित दादा सत्तेत सामील झाले याला काही विशिष्ठ आणि ठोस कारणे आहेत. जनतेला काही घेणे देणे नसते सत्तेत कोण आहे, किंवा मुख्यमंत्री कोण आहे. जनतेला विकास हवा असतो. कामांची पूर्ती हवी असते. लोकांची काम करायची म्हणजे हातात सत्ता हवी. सत्तेशिवाय लोकांची कामे करण्यात मर्यादा येतात हे जवळपास सर्वच राजकारणी मान्य करतात. निवडणुकांना १.५ वर्षे बाकी असताना हाती घेतलेली रखडलेली कामे करण्यासाठीच म्हणून दादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला.

अडचणींचे रडगाणे गाणे अजित दादांना कधीच जमले नाही. धाडसीपणे निर्णय घेऊन ते राबविण्याचा बाणा अजित दादांनी कायम अंगी राखला. यावेळी देखील तेच झाले. पवार साहेबांच्या विरोधात जाऊन सत्तेत सामील व्हायला वाघाचं काळीज लागतं. अजित दादांनी ते धाडस दाखवलं.

मुख्यमंत्री दर्जाचा पुढारी असून देखील दादा आजवर मुख्यमंत्री का नाही झाले हा महाराष्ट्राला पडलेला सर्वात मोठा प्रश्न. दादांची कार्यशैली जसं सामान्य जनतेला अचंबित करते, तसचं राजकारणात त्यांची हीच कार्यशैली काही नेत्यांच्या डोळ्यात खुपते. त्यामुळे हीच ती योग्य वेळ समजून दादांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतेली आणि जनतेला पडलेल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळू लागलं.

राजकारण हा खेळच असा आहे. इथे कायम संबधित राहावे लागते. समाजकारण अखंडित चालू ठेवण्यासाठी काही कटू निर्णय धाडसी निर्णय घ्यावे लागतात. पण वास्तवात पाहता पवार साहेब गट आणि अजित दादा गट हे दोन्ही गट पक्ष फुटल्याचे मान्य करीत नाही. उलट आमच्यातला एक गट सत्तेत सामील झाला आहे पक्ष फुटला नाही हेच पवार साहेबांकडून अधोरेखित केले जात आहे.

Share via
Copy link