काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल बाहेर पडून आपलं पॅनल निवडून आणण्याची किमया ज्या व्यक्तीने करून दाखवली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सद्यस्थितीला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे श्री. अजितदादा पवार साहेब. अजितदादांनी १९८३ ते ८४ यादरम्यान झालेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली होती. बारामती व इंदापूरच्या सीमेवर असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते १९८४ मध्ये निवडून गेले. १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचा आणि नंतर बँकेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार पाहताना बँकिंग क्षेत्रात त्यांनी कामातील आपल्या अनोख्या शैलीचा अमीट ठसा उमटवला.
कालानुरूप तो दिवस उजाडला जेव्हा अजितदादा पवार यांनी १९९१ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि विधिमंडळ कामकाजातील अधिकृत सदस्य ते बनले. त्यानंतर दादांनी आपल्या विजयाची पताका आजतागायत फडकवत ठेवली आहे. अनेकदा कॅबिनेट मंत्री पद त्यांनी भूषवले. पाणीपुरवठा, स्वच्छता व पाटबंधारे मंत्री पदाची धुरा सांभाळताना ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान, कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास अशा सर्व विभागांमध्ये त्यांनी आदर्शवत कामं केली.
विशेष बाब अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून आणि ती जिंकून अजितदादा अवघे २७ वर्षांचे असताना खासदार बनले. अशा पद्धतीने आमदार, खासदार आणि मंत्री अशी राजकीय कारकीर्द अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवली. मुंबईत विधानसभेचे गटनेते म्हणून समर्थपणे त्यांनी जबाबदारी सांभाळली.
मागील ३० ते ३५ वर्षांत राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणारे अजितदादा २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्याबरोबरच वित्त विभागाची पुन्हा जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली. त्यापुढील अडीच वर्ष अजितदादांनी चालवलेला राज्याचा कारभार आणि आर्थिक गाडा हा प्रशंसनीय चर्चेचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मिळालेले अर्थमंत्री पद सांभाळताना त्यांनी राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला. जेणेकरून देशाचे भविष्य असणारी युवा पिढी व्यसनातून बाहेर पडावी. अजितदादांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासनाला गती दिली.
सध्याच्या घडीला अजितदादा पवार महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत जबाबदारी कोणतीही अंगावर येवो, त्या जबाबदारीला दादा योग्य न्याय देत आले आहेत आणि यापुढेही देतील यात काही दुमत असायचं कारण नाही. सत्तेत असो वा विरोधी बाकावर त्यांनी पुढे हाकलेली विकासाची कामं कधी थांबलेली नाहीत. विकासाभिमुख लोकनेता अशी अजितदादांची ओळख आहे आणि ती निरंतर राहील.