कार्यकर्त्यांचे सरसेनापती – अजित दादा.

अजित दादा आणि कार्यकर्ते यांचे नाते किती अतूट आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. ब्लॉगच्या माध्यमातून आपण या आधीही दादा आणि कार्यकर्ते यांच्यातील घनिष्ट संबंधांचे किस्से तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. काल घडलेला असाच एक किस्सा.

आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून राज्यात अजित दादा यांच्याकडे पाहिले जाते. घटना कितीही किरकोळ असली तरी जिवाभावाचा कार्यकर्ता जेव्हा संकटात असतो, तेव्हा हा थोरला भाऊच मदतीला धावून येतो, याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा बारामतीत आला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणारे बारामती तालुक्यातील कटफळ येथील तानाजी पांडुरंग मोकाशी बुधवारी हे शिखर शिंगणापूर वरून घरी परत येत असताना, मेखळी रोडला डोर्लेवाडी फाट्या नजीक टँकरने अचानक वळण घेतल्याने मोकाशी यांच्या दुचाकीची टँकरला धडक लागून अपघात झाला.

या अपघातात मोकाशी यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. ही घटना घडल्यावर एका व्यक्तीने थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधत या अपघाताची माहिती त्यांना दिली. पवार यांनीही तातडीने आपला कार्यकर्ता अपघातग्रस्त झालाय म्हटल्यावर तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना त्याच्या उपचारासाठी हालचाली करण्यास सांगितले. केवळ एवढे करुनच ते थांबले नाहीत तर दर तासाला त्यांनी या कार्यकर्त्याच्या प्रकृतीची विचारपूस सुरुच ठेवली होती. डॉक्टरांना सूचना देत त्यांच्यावर उत्तम उपचार करा हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. दवाखान्याच्या कामात दादा किती खंबीरपणे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात, याचेच हे एक उदाहरण असल्याची बारामतीत नंतर याची चर्चा होती.

दादांच्या नेतृत्वाचे हेच गमक आहे. जमिनीवरील कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी दादांच्या संपर्कात असतात. ते दादांना आपलंस मानतात. घरातील सदस्य मानतात. दादा त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. वेळप्रसंगी दादा मोठ्या भावाप्रमाणे खडसावतात देखील. राष्ट्रवादी कुटुंबात शरद पवार साहेब हे आधारवड आहेत आणि अजित दादा सर्वांचे मोठे भाऊ. कार्यकर्त्यांसाठी दादांचे जे समर्पण आहे ते पाहून कार्यकर्त्यांनादेखील दादांचा कायम हेवा वाटतो. म्हणूनच कार्यकर्ते दादांसाठी वाटेल ते कार्य करण्यासाठी तयार असतात.