खंबीर विरोधी नेतृत्व – अजित दादा पवार

गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन पार पडले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधारी उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हते. महाराष्ट्रापुढे अनेक महत्वाचे प्रश्न असताना सत्ताधारी मात्र त्या प्रश्नांना बगल देऊन विरोधकांना भलत्याच शाब्दिक तावडीत धरून अधिवेशनाचा वेळ वाया घालवीत होते. तरीही अजित दादांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. एकीकडे नागपूर NIT च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू असताना, विधान भवनाबाहेर भाजपाचेही सुषमा अंधारेंविरोधात आंदोलन सुरू होते.

भाजप आणि शिंदे गटाचा नक्की काय प्रॉब्लम आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळत नाहीये. भाजप सत्तेत नव्हती तेव्हाही आरडाओरडा करत होती, आता सत्तेत आहे तरीही आंदोलन करत आहेत. फडणवीसांना किती दिवस मोदींचा सहारा घेऊन सत्तेतही फळं खाता येणार आहे कुणास ठाऊक? कारण त्यांचा एकही आमदार त्यांच्या नियंत्रणात नाही असच दिसून येत आहे.

अजित दादा विरोधी पक्ष नेते या नात्याने मात्र या अधिवेशनात १००% खरे उतरले आहेत. एका नामांकित न्यूज पोर्टलने घेतलेल्या पोलमध्ये ‘हिवाळी अधिवेशन कोणत्या नेत्याने गाजवले या प्रश्नाचे उत्तर देताना महाराष्ट्रातील जनतेने अजित दादांना पहिली पसंती दिली आहे. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण असो, वा जयंत पाटील साहेबांना पाठींबा देणे, मित्रपक्षांची बाजू मांडणे असो वा महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरणे, अजित दादांनी चोहीकडून बॅटिंग करून सरकारला जेरीस आणले हे सत्य कुणीही नाकारणार नाही.

यंदाच्या अधिवेशनात महापुरुषांचा वारंवार होणारा अपमानही महत्वाचा आणि गंभीर मुद्दा होता. केवळ विरोधासाठी विरोध ही महाविकास आधाडीची भूमिका नाही हे अजित दादांनी स्पष्ट केले. महापुरुषांचा सातत्याने होणारा अपमान, सीमाप्रश्न हाताळण्यात आलेले अपयश व विदर्भाच्या अनुशेषाबाबतची उदासीनता या मुद्द्यांवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दादांचा वाढता दबाव पाहून हबकलेल्या सत्ताधाऱ्यांना मात्र घाम फुटला. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी धर्मवीर कि स्वराज्यरक्षक हा बाष्कळ मुद्दा उचलून धरला. भाजप आणि शिंदे गट बाष्कळ मुद्द्यावर तासोनतास गदारोळ करून कश्याप्रकारे सभागृहाचा वेळ वाया घालवीत होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. अजित दादांनी मात्र त्यांची कुटील खेळी उधळून लावली. सभागृह भरकटत असताना आणि अध्यक्षांच्या पक्षपातीपणामुळे अजित दादांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सभात्याग करून सरकारला वेठीस धरले.