पदांना न्याय देणारं उमदं व्यक्तिमत्व…

कामाचा जे करतात वायदा ते फक्त अजितदादा!

महाराष्ट्राच्या राजकारणातलं कार्य कर्तृत्ववान आणि पदांना उचित न्याय देणारं उमदं व्यक्तिमत्व म्हटलं की आपसूक ज्यांचं नाव प्रथम ध्यानी येतं ते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. जलसंपदा खात्यात अजितदादा पवार यांनी देशपातळीवर केलेली अव्वल कामं म्हणजे त्यांनी जलनिती निश्चित केल्याचं दिसून येतं. यासाठी त्यांनी महाराष्ट्र सिंचन वितरण प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ व महाराष्ट्र जलसंपदा नियमन कायदा २००५ हे कायदे मंजूर करून घेतले. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वायत्त प्राधिकरणाची स्थापना केली.

महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प, लाभ क्षेत्रात समन्यायी तत्वावर पाण्याचे वाटप, सर विश्वेश्वरय्या कालवा स्वच्छता अभियान, पिण्याच्या पाण्यासाठी जलस्वराज्य, महाजल, स्वजलधारा योजना, ग्रामीण भागातील पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी ३६० लघू प्रयोग शाळांची स्थापना असे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत.

पाटबंधारे मंत्री पद भूषवताना अजितदादांनी त्यांच्या कार्यकाळात १४० पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून राज्यातील १ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र नव्यानं सिचंनाखाली आणलं. त्याचबरोबर नजीकच्या काळात सुमारे एक लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी ३२ नव्या पाटबंधारे प्रकल्पांना मंजुरी दिली. फळबाग लागवड योजनेत १७ औषधी वनस्पतींचा समावेश करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन निर्माण करून देण्याचं काम देखील दादांनीच केलं.

ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना अजितदादांनी प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण विकास योजना अधिक सक्षम व कार्यक्षम बनवण्यासाठी नवा आकृतिबंध लागू केला. केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधीचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळावा यासाठी स्थापण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समित्यांची पुनर्रचना केली. ग्रामविकास संचालनालयाची निर्मिती केली.

अजितदादांनी ऊर्जामंत्री म्हणून मार्गी लावलेली कामं ही ऐतिहासिक स्वरूपाची आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे महानिर्मिती, महावितरण आणि विद्युत पारेषण या तीन कंपन्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर वीज निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचं काम त्यांनी केलं. मर्यादित स्वरूपात का होईना महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न अजितदादांनी केला.