महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री. अजितदादा पवार यांना राजकीय वारसा लाभला असला तरी, ते त्या माध्यमातून राजकारणात आलेले नाहीत. कोल्हापूर येथून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर अजितदादांनी काटेवाडीमध्ये शेती करायला सुरुवात केली. प्रारंभीस त्यांनी टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे हे पीक पाहण्यासाठी दुरून शेतकरी येत असत. त्यानंतर दादांनी शेती क्षेत्रात विविध प्रयोग केले. दुधाचा व्यवसाय केला. जनावरांची खरेदी केली. त्यावेळी जनावरांसाठी बाजारातून ते स्वतः कडबा खरेदी करत. याशिवाय कुक्कुटपालन व्यवसाय केला. हे सगळे उद्योग करताना सगळी कामं ते स्वतः करत. दादांनी काटेवाडी ते कन्हेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं. लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांची आधीपासूनच राहिली आहे. लोकांनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी घेऊन ते आदरणीय शरद पवार साहेबांकडे जात. तिथे प्रश्न मार्गी लावत असत. अशा पद्धतीनं समाजकारण करता करता अजितदादा राजकारणाच्या वाटेवर येऊन उभे राहिले. आणि अखेर राजकारणात प्रवेश झाला.
१९९१ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादा विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते आजतागायत जिंकून येत आहेत. १९९१ मध्येच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १९९२ ते १९९३ या कालावधीत जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. त्यानंतर १९९९ ते २००३ यादरम्यान पाटबंधारे व फलोत्पादन, २००३ ते २००४ या काळात पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. मग २००४ ते २०१० पर्यंत जलसंपदा व ऊर्जा ही खाती त्यांनी सांभाळली. नोव्हेंबर २०१० मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना ऊर्जा, वित्त व नियोजन या खात्यांचा कामकाज त्यांनी पाहिला. ही वेगवेगळी खाती सांभाळताना अजितदादांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील बहुतेक सगळी महत्त्वाची पदं भूषवल्यानंतर, त्या पदांना न्याय दिल्यानंतर आता अजितदादा विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जनमानसाच्या सेवेसाठी झटत आहेत. अशा तऱ्हेनं दादांचा हा राजकारणापर्यंतचा प्रवास एक प्रगतशील शेतकरी, लघुउद्योजक, संचालक, चेअरमन, उपमंत्री, मंत्री व उपमुख्यमंत्री असा टप्याटप्यानं झाला आहे. प्रत्येक पदावर उत्तम काम केल्यामुळे पुढची संधी त्यांना मिळत गेली. प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना दादांनी त्यांची योग्यता, गुणवत्ता सिद्ध केली. म्हणूनच वारसा म्हणून दादा राजकारणात आले किंवा त्यांना पदं मिळाली असं अजिबात नाही. उपमुख्यमंत्री असताना दादांनी लावलेला कामांचा धडाका हा त्यांच्यातल्या कार्यशील नेत्याचे दर्शन घडवतो. ते एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहेत हे विरोधक देखील मान्य करतात. एवढ्या कार्यक्षम, समर्थ आणि अनुभवसंपन्न व्यक्तीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले तर, महाराष्ट्र हे देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य बनेल यात काडीमात्र शंका नाही.