विकासपुरुष – भाग २

जो मैदानात उतरतो तोच खरा खेळाडू असतो, त्याच खेळाडूमध्ये धमक असते. वातावरण निर्मिती अशी करतो की अंतिम सामन्याचा निर्णय आपल्या बाजूनं लागेल. राजकीय मैदानातले असेच एक महान खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार. एकदा का चेंडू फेकला म्हणजेच शब्द फेकला की त्याचा निकाल त्यांना हवा तोच लागणार, हे ठरलेलं असतं. क्षेत्र कोणतंही असो दादांचा कामाचा आवाका एवढा मोठा आहे की जिथून त्यांची स्वारी जाईल तिथं विकास पोहोचलाच पाहिजे. एक धडाडीचा नेता, कणखर नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अजितदादांना ओळखतो. दादांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली पार पडणारे प्रकल्प हे पूर्णत्वास जाणार याची खात्री जनतेला सुद्धा असते. दादा लक्ष घालतायेत म्हणजे काम पूर्ण होणारंच, असं आपसूक मनातल्या मनात बोललं जातंच.

ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे एकमेव असे नेते आहेत ज्यांची कामाची सुरुवात भल्या सकाळी ६ वाजता होते. सर्वसामान्य जनतेच्या हिताशी, सोयीशी जोडलेले प्रकल्प आणि कामाचा आढावा अजितदादा स्वतः जाऊन घेतात. त्यामुळेच ‘लोकप्रतिनिधी’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास दादांच्या कामाकडे पहावं. बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची भूमिका ही नेहमीच कठोर राहिली आहे. कामाच्या बाबतीत जराही हलगर्जीपणा ते खपवून घेत नाही. प्रकल्पाच्या कामात त्रुटी आढळून आल्यास संबंधित कामाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो. रोखठोक दादा कामाच्या बाबीत कुणालाही जुमानत नाहीत.

केवळ वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी नव्हे तर दादा नेतेमंडळींना देखील सूचना करतात. आपण जनतेचे सेवक आहोत. जनता आपल्याला निवडून देते जेणेकरून त्यांची कामं आपण मार्गी लावू. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं अतिशय जबाबदारीनं आपापल्या मतदारसंघात लक्ष घातलं पाहिजे, असं अजितदादा निक्षून सांगतात. त्यांच्या कामाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘बारामती’. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचा झालेला विकास म्हणजे जगभरात चर्चेचा विषय बनून राहिला आहे. बारामती म्हणजे विकासाचे मॉडेल असं म्हटलं जातं. आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असं बारामतीचं रूप बघण्यासारखं आहे. उद्योग-व्यवसायांचा विस्तार, शिक्षण आणि रोजगार अशा अनेक कारणांसाठी बारामतीच्या दिशेनं लोकांची पावलं वळू लागली आहेत. आधुनिकतेची कास धरत राज्याचा विकास घडवण्यासाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा.

II बहुजन हिताय I बहुजन सुखाय II
या ब्रिदवाक्याला साजेशी अशी कामगिरी अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कायमच बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांचं अनुकरण करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजितदादा पवार यांनी राजकारणात एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख कमावली आहे. पवार साहेब हे एक वटवृक्ष असून त्यांच्या छत्रछायेखाली दादांनी स्वतःला घडवलं आहे. अजितदादा महाराष्ट्रभर दौरे करून त्या माध्यमातून राज्यातील विकासाचा आढावा घेत असतात. राज्यातील जनता कोणकोणत्या समस्यांनी ग्रासलेली आहे त्यासंदर्भातली माहिती ते वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडून घेत असतात. राज्याचा विकास साधताना कितीही अडचणी आल्या, आव्हानं आली तरी त्यांना कशा पद्धतीनं हाताळायचं यासाठीची क्लूप्ती आणि दूरदृष्टी विकासपुरुष अजितदादांकडे आहे.